दोस्तांनो, आई-बाबा दररोज वहीमध्ये खर्चाचा हिशेब लिहून ठेवतात हे तुम्ही पाहिले असेल ना ? ते असं का करतात माहित आहे ? पैशांचा व्यवस्थित हिशेब लागावा आणि बचत करता यावी म्हणून. मग, आपल्यालाही आई-बाबांना थोडा हातभार लावता येईल. आपल्याला आपल्या पिगी बँकेपासूनच बचतीला सुरूवात करता येईल. आई-बाबा महिन्याच्या सुरूवातीला पगार झाला की त्यातील काही पैसे बँकेमध्ये ठेवतात. आपणही तसंच करायचं. आपल्याला कुणीही खाऊसाठी किंवा बक्षिस म्हणून पैसे दिले की ते लगेच पिगी बँकेमध्ये ठेवायचे. काही महिन्यांनी पाहिल्यावर आपली पिगी बँक पैशांनी गच्च भरलेली असेल. पिगी बँक लवकर भरावी असं वाटत असेल तर आपली बचतीची कल्पना आई-बाबांबा सांगायची. मग, ते दररोज एक-दोन रूपये देऊन आपली पिगी बँक भरायला मदत करतील.
परीक्षेचा निकाल लागला की आपल्याला खूप जणांकडून बक्षिस म्हणून पैसे मिळतात. ते पैसे एकत्र करून आपण चॉकलेट, ड्रेस किंवा खेळणं घेण्यासाठी आई-बाबांकडे हट्ट करतो. त्याऐवजी शाळेसाठी आवश्यक असलेली वस्तू, हस्तकलेचं सामान, चित्रकलेची वही किंवा रंग विकत घेतले तर पैशांचा सदुपयोग होईल. आपल्या एखाद्या मित्राने किंव मैत्रिणीने एखादी वस्तू किंवा ड्रेस विकत घेतला की आपल्यालाही नेमकं तेच हवं असतं. पण, मैत्रिणीने ती वस्तू घेतली म्हणून आपल्याकडे ती असायलाच हवी असं नाही. कदाचित, थोडी वाट पाहिली तर आपल्याला त्याहूनही चांगली वस्तू मिळू शकते. असं शहाण्यासारखं वागलं आणि पैशांची बचत करायची सवय लावून घेतली तर आई-बाबा आपल्याला नक्कीच शाबासकी देतील.