Friday, 18 September 2015

पाच लाख मूर्ती, पंधरा हजार लोकांना रोजगार, गणेशमूर्तींचे माहेरघर हमरापूर








पाच लाख मूर्ती, पंधरा हजार लोकांना रोजगार, गणेशमूर्तींचे माहेरघर हमरापूर
हमरापूर  - पेण तालुक्यात गेल्या शंभर वर्षांपासून शाडूच्या मातीपासून गणपती बनवले जात आहेत; परंतु प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींचा जमाना आला आणि मग आसपासच्या गावांतल्या घराघरांमध्ये ही गणपती कला फोफावत गेली. पेणपासून अवघ्या ७ किमीवर आणि मुंबईपासून ८२ किलोमीटर अंतरावर असलेल्या हमरापूर या गावात शिरल्यानंतर गणपतीचे कारखाने नजरेत भरतात. या कारखान्यात लहान, मध्यम आणि मोठ्या अशा विविध आकारातल्या कच्च्या पांढऱ्या मूर्ती नजरेत येऊ लागतात. फक्त कारखान्यातच नाही, तर घरातल्या अंगणात, पडवीतही विराजमान झालेले आहेत. जवळपास प्रत्येक कारखान्यात लगबग सुरू होती.

गणेशोत्सवाचे स्वरूप जसे बदलले तसे हमरापूर, जोहे, कळवा, शिर्की, कणे, वडखळ, गडब, कासू, भाल या बहुतांश गावांमधील अर्थकारण बदलले आणि रोजगाराच्या संधीही वाढत गेल्या. या गावांमध्ये सुमारे ५ लाख मूर्ती तयार होताता. सुरुवातीला हमरापूरमध्ये केवळ तीनच कारखाने होते; पण आता जवळपास साडेचारशे कारखाने या भागात आहेत. चांगला पैसा मिळू लागल्यानंतर आता सगळेच विशेषकरून युवावर्ग या व्यवसायात उतरला आहे. इथला पाचवी नापास मुलगादेखील दिवसाला हजार – पंधराशे रुपये कमावू शकतो. कमीत कमी ३०० ते ५०० रुपयांपर्यंत रोजंदारी मिळते. गणपती बनवण्याच्या या व्यवसायाने जवळपास पंधरा हजारांपेक्षा जास्त जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शाडू माती जड असल्याने त्यात मोठ्या मूर्ती घडवणे शक्य होत नसल्याचे पवन आर्ट मूर्तिशाळेचे दिनेश पाटील यांनी सांगितले.
५० कोटींची उलाढाल
राजस्थानमधून हमरापूरमध्ये १० ते १५ हजार टन पीओपी येतो. कच्च्या मूर्ती केवळ मुंबई, पुणेच नाही तर गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि यंदा तर दिल्लीपर्यंत गेल्या आहेत. गणपती मूर्ती व्यवसायातून ४० ते ५० कोटींची उलाढाल या विभागात होते. एका कारखान्यात २० ते २५ हजार मूर्ती तयार होतात. मूर्ती बनवण्याचे काम गणेशोत्सव व नवरात्री अशा दोन्ही उत्सवांमध्ये जवळपास वर्षभर सुरू असते.